बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

आंबिवली–टिटवाळा जोडशहरांत नागरी सुविधांचा अभाव

( उत्तरार्ध )
आंबिवली–टिटवाळा परिसरासाठी स्वतंत्र प्रभाग समिती असूनही एका प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय येथे महापालिकेने कोणतीही नागरी सुविधा पुरविलेली नाही. या भागाला प्रशस्त आणि सुसज्ज रुग्णालय, क्रीडासंकुल, खेळाची मैदाने, उद्याने, भाजी मंडई, मच्छी मार्केट, वाहन तळ, समाज मंदिरे, अंतर्गत मल:निसारण यंत्रणा यांची आवश्यकता असतानाही काहीही मिळालेले नाही. येथील ‘सक्षम’ नसलेले लोकप्रतिनिधी अशा सुविधा येथील जनतेला मिळवून देण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट चित्र आहे. नाही म्हणायला एनआरसी कॉलनी प्रभागात एक छोटेखानी उद्यान काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते, आता त्याचीही दुरवस्था झाली आहे.


टिटवाळा येथील गणपती मंदिरा लगत असलेल्या तलावाभोवती करण्यात आलेल्या सुशोभीकरण प्रकल्पामुळे येथे एकमेव विकासकाम दिसते. मात्र तेथे बाहेरून येणार्‍या गणेशभक्तांच्या गर्दीमुळे स्थांनिकांना त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. खड्डेयुक्त रस्ते, फेरिवाल्यांनी घेरलेला रेल्वे स्थानक परिसर, प्रवाह खंडीत गटारे, तुंबलेले नाले,बेशिस्तपणे रस्त्यांवर होणारी कार पार्किंग, अस्वच्छतेने गाठलेला कळस, जमिनीवर रेंगाळणार्‍या जलवाहिन्या, माणसांचा जीव घेऊ पाहणार्‍या वीजवाहिन्या ही या उदयोन्मुख जोडशहरांची ओळख झाली आहे. नियोजनबध्द शहर विकास ही संकल्पना येथील एकाही नगरसेवकाच्या पचनी पडलेली नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
विकासाच्या दिशेने...
आंबिवली–टिटवाळा यांना जोडशहरे मानून या भागाच्या विकासाकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने आणि येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. ‘अ’ प्रभाग क्षेत्रामधून आजपर्यंत निवडून आलेल्या एखादा अपवाद वगळता कुणाही नगरसेवकाकडे शहराच्या विकासाची ‘दृष्टी’ नसल्याचे सिध्द झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत वर्चस्व राखून असलेल्या कल्याण आणि डोंबिवली शहरातील राजकीय धुरिणांनी ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील नगरसेवकांना कायम दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. राजकीय पक्षांच्या लेखी या भागाला कोणतीही किंमत नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. ही परिस्थिति बदलल्याशिवाय आंबिवली-टिटवाळाजोडशहरांचा नियोजनबध्द विकास अशक्यच आहे. या जोडशहरातील सर्वपक्षिय नगरसेवकांनी एकत्र येवून आंबिवली-टिटवावाळ्याच्या विकासाचा संयुक्त कृती आराखडा आखण्याची गरज आहे. त्यासाठी प्रभागनिहाय प्राथमिक नागरी सुविधांची पूर्तता पहिल्या टप्प्यात करून घेतली पाहिजे. दुसर्‍या टप्प्यात पक्षिय भेद विसरून काही मोठे प्रकल्प या जोडशहरांसाठी खेचून आणले पाहिजेत. उदा. सुसज्ज क्रीडासंकुल, दोन छोटेखानी सुसज्ज रुग्णालये, रेल्वे स्थानका जवळ वाहनतळ, भाजी मंडई. त्याचप्रमाणे आंबिवलीमध्ये ग्रंथालयाची असलेली नितांत आवश्यकता पूर्ण झाली पाहिजे.
जनतेची मानसिकता आणि सहभाग
शहराच्या नेतृत्वाबरोबरच येथील जनतेची मानसिकता विकासाच्या दृष्टीने सकारात्मक असणे महत्वाचे आहे. जनतेचा सक्रिय सहभाग हा शहर विकासाला पोषक ठरणारा असतो. नागरी सुविधांच्या नावाने ‘लूटमार’ करणार्‍या लोकप्रतिंनिधी आणि अधिकार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी, शहर विकासात कल्पक सहभाग देण्यासाठी सुजाण आणि जागरूक आंबिवली आणि टिटवाळावासीयांनी पुढे आले पाहिजे. शहर विकास समित्या वा अन्य संघटनात्मक मंचच्या माध्यमातून येथील जनतेने शहर विकासाला दिशा देण्यात आपले योगदान दिले पाहिजे.
अन्यथा खेळखंडोबा अटळ !
आंबिवली आणि टिटवाळा येथील नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि सुजाण नागरिकांनी आता तरी अधिक उशीर न करता शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले पाहिजे. येथील जनतेला पुरेशा नागरी सोयीसुविधा पुरविल्या पाहिजेत. राज्य सरकार आणि अन्य प्राधिकरणांकडील विविध योजना, प्रकल्प या जोडशहरांसाठी खेचून आणले पाहिजेत. तसे न झाल्यास या भागाचा खेळ खंडोबा यापुढेही असाच सुरू राहील, हे ठरलेलेच आहे !

--
लेखक : प्रविण आंब्रे 

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

आंबिवली–टिटवाळा जोडशहरांच्या विकासाचा झालाय खेळखंडोबा

(पुर्वाध)

कोणत्याही शहराचा विकास हा तेथील नेतृत्वाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. नेतृत्व जर सक्षम असेल तर त्या शहराचा सर्वांगिण विकास होईल, अन्यथा बकालपणाखेरीज तेथील नागरिकांना काहीही मिळणार नाही. अशीच काहीशी गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येणार्‍या आंबिवली आणि टिटवाळा या नव्याने विकसित होणार्‍या दोन जोडशहरांची झाली आहे. येथील कल्याण-डोंबिवली महापालिका १९८३ साली स्थापन झाली. मात्र येथे लोकप्रतिनिधींची राजवट प्रत्यक्ष येण्यास १९९५ साल उजाडले. तेव्हापासून आंबिवली–टिटवाळा परिसरात येणार्‍या प्रभागांमधून ‘सक्षम’ नेतृत्व पुढे न आल्याने या भागाची जी फरपट सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे.


आंबिवली–टिटवाळा ही मध्य रेल्वेच्या कल्याण–कसारा मार्गावरील रेल्वे स्थानके आहेत. याला जोडून शहाड रेल्वे स्थानक अशी एकूण तीन स्थानके असलेल्या ९ प्रभागांचा परिसर महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रात येतो. महापालिकेच्या स्थापनेपासूनच हा परिसर विकासापासून कायम दूर राहिला. त्याची सुरुवात विकास आराखड्यापासूनच होते. महापालिकेने मंजूर केलेला विकास आराखडा, त्यामधील विविध प्रयोजनांसाठी टाकलेल्या आरक्षणांच्या अंमलबजावणीकडे महापालिका प्रशासनाने नेहेमीच कानाडोळा केल्याचे दिसते. भौगोलिकदृष्ट्या या ९ प्रभागांच्या परिसराचे आंबिवली आणि टिटवाळा असे दोन भाग पडतात. या भागातील वाढते नागरीकरण, वाढती लोकसंख्या व वाढता व्यापारउदीम ही त्याची ठळक लक्षणे आहेत.

आज घडीला उदयोन्मुख असलेल्या आंबिवली आणि टिटवाळा परिसराची लोकसंख्या सुमारे एक लाखापेक्षा अधिक असून त्यामध्ये दिवसेगणिक वेगाने भर पडत आहे. नव्या इमारती, गृहसंकुलांनी ही शहरे रडतखडत विकासाकडे वाटचाल करत असतानाच अनधिकृत चाळी व झोपड्यांनी विकास आराखड्यालाच नख लावले आहे. परिणामत: ही उदयोन्मुख शहरे अस्ताव्यस्तपणे वाढत आहेत. अनधिकृत बांधकामांचा गोरखधंदा स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने फोफावला आहे. ग्रीन झोन म्हणून आरक्षित असलेल्या भूखंडांवर चाळ संस्कृतीने अतिक्रमण केले आहे. येथील टेकड्या पोखरून तेथे बेकायदा चाळी उभारण्याचा गोरखधंदा राजरोस सुरु आहे. अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या चाळींना पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा देण्याचे पाप महापालिका आणि महावितरणच्या कर्मचार्‍यांनी इमानेइतबारे केले. काही नगरसेवक हे स्वत:च अशा अनधिकृत बांधकामांचे ‘सरनोबत’ झाल्याचे येथील मतदारांनी उघड्या डोळ्यांनी पाहीले.

गेल्या दोन – तीन महिन्यांपूर्वी मांडा पूर्वेतील (टिटवाळा) नांदप रस्त्यावरील इंदिरानगर परिसरातील सुमारे दोन हजारपेक्षा अधिक घरे असलेल्या चाळींचा प्रश्न उग्र झाला होता. येथील सरकारी रुग्णालय, मनोरंजन पार्क, गृहनिर्माण संस्था, क्रीडांगण, वाहनतळ या प्रयोजनांसाठी आरक्षित जमिनीवर या चाळी वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने उभ्या राहिल्या. सदर जमीन ताब्यात घेण्यासाठी या चाळींवर कारवाई करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेताच येथील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेत टिटवाळा स्थानकात रेलरोको केला होता. त्यानंतर पालिकेने या कारवाईबाबत ‘आस्ते कदम’ घेतले  तरी हा प्रश्न संपलेला नाही. या चाळीत राहणाऱ्या सुमारे दहा हजाराच्या घरात असलेल्या रहिवाश्यांपुढे जायचे कुठे असा गहन प्रश्न उभा ठाकला आहे. आपल्या डोक्यावरील छप्पर कधीही निघून जाईल, अशा चिंतेत येथील नागरिक आज कसाबसा आला दिवस ढकलत आहेत.

--
लेखक : प्रविण आंब्रे 

सोमवार, २४ जुलै, २०१७

फेरीवाला मुक्त स्कायवॉक’ने ‘करुन दाखवता येते’ हे सिध्द केले!

पदपथ रस्त्यांवर अतिक्रमण करुन धंदा करणारी जमात अन्य शहरांप्रमाणेच कल्याण, डोंबिवली, आंबिवली,  टिटवाळा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वाढत्या संख्येने आहे. दिवसेंदिवस त्यांची संख्या आणखी वाढतच आहे. तसेच महापालिकेतील २७ गावांच्या विकसित होणाऱ्या भागातही फेरिवाल्यांनी चांगलेच हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. फेरिवाला या व्याख्येनुसार फिरता धंदा करणाऱ्यांना साधारणपणे फेरिवाला विक्रेता म्हणता येईल. मात्र या फेरीवाल्यांनी फिरता धंदा करण्याऐवजी चक्क पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण करीत दुकानेच थाटली आहेत. रेल्वे स्थानक परिसर आणि शहरातील छोट्यामोठ्या बाजार परिसरात फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे.

कल्याण – डोंबिवली महापालिके प्रमाणेच मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातही हे फेरीवाले त्रासदायक ठरू लागले आहेत. मुळात किरकोळ वस्तू वा भाजीपाला विकणारे फेरीवाले आता चक्क विविध वस्तूंची दुकाने थाटून बस्तान मांडत आहेत. कामावरून व बाजारातून घरी परतताना दुकानात जाऊन खरेदीत वेळ घालवण्याऐवजी रस्त्यावरून भाजी, किरकोळ वस्तू फेरीवाल्यांकडून घेण्याचा ‘शॉर्टकट’ अनेकांना सोयीचा वाटतो. हे फेरीवाले आता रस्ते-पदपथ अडवू लागले आणि नेमकी हीच बाब अन्य शहरांप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीकरांना त्रासाची ठरत आहे. उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांची समस्या सोडवण्याचे महापालिकांना आदेश देऊनही त्या दृष्टीने विशेष प्रगती होताना दिसली नाही. एकीकडे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या पदपथ-रस्त्यांवर अतिक्रमण करण्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे मुश्कील ठरत आहे. गर्दीत एकमेकांना धक्का लागण्यामुळे भांडणतंटा होण्याचे प्रकारही घडत आहेत. काही वेळा हे भांडण टोकाला जाऊन हिंसक स्वरूपही धारण करतात. वाहनांना अडथळे होऊन वाहतूक कोंडीला देखील ही गर्दी परिणामी फेरीवालेही जबाबदार ठरतात. या फेरीवाल्यांना पदपथ-रस्त्यावरून हटविण्यासाठी महापालिकांनी अनेकदा प्रयत्न करूनही ते अपयशीच ठरले.

ठाण्यात तर फेरीवाला-रिक्षावाल्यांना हटवताना तेथील महापालिका आयुक्तांना ‘हात’ उचलवा लागला. यावरून फेरीवाल्यांचा निगरगट्टपणा किती वाढलाय हे दिसते. काही ठिकाणी अतिक्रमण हटाव पथकाचे फेरीवाल्यांशी असलेले ‘अर्थपूर्ण’ संधान, काही ठिकाणी फेरीवाल्यासाठी तडजोड करणारे एजंट, कुठे आपले ‘नेतृत्व’ चमकवून घेणारे फेरीवाल्याचे तथाकथित नेते अशा अनेक गोष्टींमुळे फेरीवाले इतक्या वर्षात हटू शकले नाहीत हे यामागील खरे वास्तव आहे. राजकीय पक्षांच्या वा राजकीय नेत्यांच्या फेरीवाला संघटना असतानाही, अनेकदा फेरीवाल्यांचे नेते महापालिकांमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले तरी ते फेरीवाल्यांना शिस्त लावू शकले नाहीत. आज मनसेत असलेले शरद गंभीरराव हे २०००-०१ मध्ये शिवसेनेचे उपमहापौर असताना त्यांनी प्रथमच फेरीवाला हटावची घोषणा करीत कल्याण डोंबिवलीतील फेरीवाल्यांविरोधात बडगा उगारला. मात्र त्यांना त्यात फारसे यश मिळाले नाही. तेव्हापासून ‘फेरीवाला मुक्त कल्याण-डोंबिवली’चे स्वप्न हे स्वप्नच राहिले.


अशा पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकालगतच्या स्कायवॉकवर तर फेरीवाल्यांनी इतके अतिक्रमण केले की प्रवाशांना तेथून चालणेच कठीण झाले. प्रवासी-पादचारी स्कायवॉक कुणासाठी असा प्रश्न थेट विचारू लागले होते. नगरसेवकांनी, राजकीय पक्ष-संघटनांनी फेरीवाला हटावच्या घोषणा अनेकदा केल्या. मात्र स्कायवॉकवरील फेरीवाल्यांनी त्यांना अजिबात जुमानले नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना तर महासभेत पालिकेलाही बाउन्सर ठेवावे लागतील असे विधान करावे लागले. असे विधान करण्यामागील त्यांचा अंतस्थ हेतू जरी वेगळा असला तरी त्यांचे विधान अनेकांनी गांभीर्याने घेतले हे विशेष. महापालिकेत शिवसेना-भाजपची युती असली तरी भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांना अखेरीस  महापालिकेच्या ‘फेरीवाला हटाव’ कामात लक्ष घालत विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशारा द्यावा लागला. त्यांनतर काही दिवसांतच (गत शनिवारी) महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, स्थानिक पोलीस ठाणे व रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) संयुक्त कारवाई करत स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली आणि स्कायवॉक मोकळा केला. तेव्हापासून स्कायवॉक ‘फेरीवाला मुक्त’ दिसत आहे. या कारवाईने मनात आणले तर ‘स्कायवॉक फेरीवालामुक्त करून दाखवता’ येऊ शकतो, फेरीवाल्यांना शिस्त लावता येऊ शकते हे सिद्ध झाले. आता स्कायवॉक किती काळ फेरीवालामुक्त राहील हे दिसेलच. यानिमित्ताने शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वापरलेली ‘करून दाखवले’ ही टॅग लाईन चांगली गाजली होती. फेरीवालामुक्त स्कायवॉक पाहताना या टॅग लाईनची आठवण झाली!

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

आंबिवलीत साकारले स्मशानभूमी, वैकुंठेश्वर मंदीर अन विरंगुळ्याचे ठिकाण

आंबिवलीत साकारले ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकाराने
स्मशानभूमी, वैकुंठेश्वर मंदीर अन विरंगुळ्याचे ठिकाण

शासकीय मदतीची वा पुढाकाराची वाट न पाहता आंबिवली येथील मोहोने गावातील ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन येथील गणेशघाट परिसराचा विकास केला आहे. उल्हास नदीच्या किनारी असलेल्या गणेशघाट परिसरात सुसज्ज स्मशानभूमीसह वैकुंठेश्वर महादेव मंदीर, नयनरम्य उद्यान विकसित करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे हा परिसर नागरिकांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण बनले आहे.  

पूर्वीचे मोहोने गाव महापालिकेत आल्यानंतर त्याची प्रभागनिहाय रचना झाली. गेल्या काही वर्षांपासून मोहोने व परिसरातील एनआरसी कॉलनी, गाळेगाव, मोहिली, बल्याणी, आंबिवली, अटाळी, वडवली परिसरात विकासाचे वारे वाहू लागले. असे असले तरी मोहोने प्रभागात सुसज्ज अशा स्मशानभूमीची वाणवा होती. गणेश घाटनजिक उघड्यावर अंत्यविधी उरकण्यात येत असे. प्रभागात सुसज्ज अशी स्मशानभूमी असावी अशी येथील नागरिकांची खूप दिवसापासूनची मागणी होती. गावातील स्थानिक रहिवाशांच्या मोहोने ग्रामस्थ मंडळाने या बाबीवर विचार सुरु केला व उल्हास नदी किनारी गणेशघाट लगतच्या मोकळ्या भूखंडावर ग्रामस्थांच्या वर्गणीतून सुसज्ज स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी जंगलस्वरूप असलेला हा भाग सुनियोजित पध्दतीने आकार घेऊ लागला. दरम्यान स्मशानभूमीचे काम प्रत्यक्षांत सुरु होऊन पूर्णदेखील झाले. परिसरात वड, बदाम, भेंडी व अन्य झाडांसह फुलझाडे लावण्यात आली.

सामाजिक काम असल्याने स्मशानभूमीच्या कामासाठी काही ग्रामस्थांनी आपली जमीनही देऊ केली. त्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढला होता. दरम्यान येथील पूर्वीपासून असलेल्या गणेश घाटाचे तत्कालीन आमदार प्रकाश भोईर यांच्या निधीतून नुतनीकरणाचे काम करण्यात आले होते. पुढे दहनविधीनंतर दशक्रिया करण्यासाठी उर्वरित जागेवर वैकुंठेश्वर महादेवाचे मंदीर बांधण्याची कल्पना काही ग्रामस्थांना सुचली व त्यांनी लोकवर्गणी काढून मार्च २०१५ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरु करून वर्षभरात पूर्ण केले. २०१६ मध्ये महाशिवरात्रीला मंदिरात महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आर्थिक स्थिती चांगली नसलेल्यांना दशक्रिया विधीसाठी आवश्यक सुविधा ग्रामस्थ मंडळ मोफत पुरविणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 
मंदिरासमोरील मोकळ्या जागेत उंचावर बैठ्या स्थितीतील १२ फुट उंचीची महादेवाची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती आंबिवली व परिसरातील श्रद्धाळू भाविकांचे विशेष आकर्षण बनली आहे. या मूर्तीभोवती नयनरम्य कारंजे उभारण्यात आले, विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा परिसर अधिकच आकर्षक दिसतो. या सर्व विकास कामासाठी मोहोने ग्रामस्थ मंडळासह सर्वच ग्रामस्थ एकजुटीने झटत आहेत.  
ग्रामस्थांसाठी सुसज्ज स्मशानभूमी असावी या उद्देशाने आम्ही स्मशान भूमी बांधली. पुढे जसजशा नवीन कल्पना सुचल्या तसा मोहोने ग्रामस्थ मंडळाने गणेशघाट परिसर विकसित केला. महापालिका व राज्य शासनाकडून जशी मदत उपलब्ध होईल ती आम्ही घेत आहोत अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.


महाशिवरात्रीची जय्यत तयारी
भाविकांना तसेच येथे येणाऱ्या नागरिकांचे उन्हापासून रक्षण व्हावे म्हणून एका ग्रामस्थाने स्वखर्चाने भव्य निवारा शेड बांधून दिले आहे. या विकसित परिसराभोवती संरक्षण भिंत व सुशोभीकरणासाठी विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाने विशेष निधीतून २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सुपूर्द करण्यात आला आहे. लवकरच सदर काम मार्गी लागेल असे सांगण्यात येत आहे. मधल्या काळात येथून जवळून जाणारा डांबरी रस्ता नव्याने करण्यात आल्याने येथील वर्दळ वाढण्यास मदत झाली आहे.
महादेवाचे मंदीर बनल्याने येथे आता महाशिवरात्रीला व प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पूजेसाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. येणाऱ्या महाशिवरात्री (दि. २४ फेब्रुवारी ) उत्सव साजरा करण्यासाठी मोहोने ग्रामस्थ मंडळाने जय्यत तयारी सुरु केली आहे.


विरंगुळ्याचे ठिकाण
मोहोने ग्रामस्थ मंडळाच्या प्रयत्नाने हा गणेशघाट परिसर आता प्रभागातील व आसपासच्या नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण ठरू लागले आहे. सायंकाळी काही क्षण निवांतपणे घालवण्यासाठी रहिवाशांचे समूह येथे भेट देतात. तसेच दररोज सकाळी आणि रात्री वॉकला जाण्यासाठी हौशी तरुण व नागरिकांना एक चांगले ठिकाण गवसले आहे. विशेष म्हणजे एका ग्रामस्थाने या ठिकाणी वाय फाय सुविधा मोफत पुरविली आहे. तरुणांसाठी ती एक पर्वणीच ठरली आहे.

सेल्फी पोइंट
येथील एका भिंतीवर चितारलेले महादेवाची पिंड घेऊन येणाऱ्या बालगणेशाचे पेंटिंग्ज या परिसराचे आणखी एक विशेष आकर्षण ठरत आहे. आबालवृद्ध या चित्रासमवेत सेल्फी काढण्याचा आनंद लुटताना दिसतात.


लेखक - प्रविण आंब्रे
मो. ७७००००९५६७