( उत्तरार्ध )
आंबिवली–टिटवाळा परिसरासाठी स्वतंत्र प्रभाग समिती असूनही एका प्राथमिक
आरोग्य केंद्राशिवाय येथे महापालिकेने कोणतीही नागरी सुविधा पुरविलेली नाही. या
भागाला प्रशस्त आणि सुसज्ज रुग्णालय, क्रीडासंकुल, खेळाची मैदाने, उद्याने, भाजी मंडई, मच्छी मार्केट, वाहन तळ, समाज मंदिरे, अंतर्गत मल:निसारण यंत्रणा यांची आवश्यकता
असतानाही काहीही मिळालेले नाही. येथील ‘सक्षम’ नसलेले लोकप्रतिनिधी अशा सुविधा येथील जनतेला मिळवून देण्यात अपयशी ठरल्याचे
स्पष्ट चित्र आहे. नाही म्हणायला एनआरसी कॉलनी प्रभागात एक छोटेखानी उद्यान काही
वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते, आता त्याचीही दुरवस्था झाली आहे.
टिटवाळा येथील गणपती मंदिरा लगत असलेल्या तलावाभोवती
करण्यात आलेल्या सुशोभीकरण प्रकल्पामुळे येथे एकमेव विकासकाम दिसते. मात्र तेथे
बाहेरून येणार्या गणेशभक्तांच्या गर्दीमुळे स्थांनिकांना त्याचा फारसा फायदा
होताना दिसत नाही. खड्डेयुक्त रस्ते, फेरिवाल्यांनी घेरलेला रेल्वे स्थानक परिसर, प्रवाह खंडीत गटारे, तुंबलेले नाले,बेशिस्तपणे रस्त्यांवर होणारी कार पार्किंग, अस्वच्छतेने गाठलेला कळस, जमिनीवर रेंगाळणार्या जलवाहिन्या, माणसांचा जीव घेऊ पाहणार्या वीजवाहिन्या ही
या उदयोन्मुख जोडशहरांची ओळख झाली आहे. नियोजनबध्द शहर विकास ही संकल्पना येथील
एकाही नगरसेवकाच्या पचनी पडलेली नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
विकासाच्या दिशेने...
आंबिवली–टिटवाळा यांना जोडशहरे मानून या भागाच्या विकासाकडे कल्याण-डोंबिवली
महापालिका प्रशासनाने आणि येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. ‘अ’ प्रभाग क्षेत्रामधून आजपर्यंत निवडून आलेल्या एखादा अपवाद
वगळता कुणाही नगरसेवकाकडे शहराच्या विकासाची ‘दृष्टी’ नसल्याचे सिध्द झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत वर्चस्व राखून असलेल्या
कल्याण आणि डोंबिवली शहरातील राजकीय धुरिणांनी ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील नगरसेवकांना कायम दुय्यम
दर्जाची वागणूक दिली आहे. राजकीय पक्षांच्या लेखी या भागाला कोणतीही किंमत
नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. ही परिस्थिति बदलल्याशिवाय
आंबिवली-टिटवाळाजोडशहरांचा नियोजनबध्द विकास अशक्यच आहे. या जोडशहरातील सर्वपक्षिय
नगरसेवकांनी एकत्र येवून आंबिवली-टिटवावाळ्याच्या विकासाचा संयुक्त कृती आराखडा
आखण्याची गरज आहे. त्यासाठी प्रभागनिहाय प्राथमिक नागरी सुविधांची पूर्तता पहिल्या
टप्प्यात करून घेतली पाहिजे. दुसर्या टप्प्यात पक्षिय भेद विसरून काही मोठे
प्रकल्प या जोडशहरांसाठी खेचून आणले पाहिजेत. उदा. सुसज्ज क्रीडासंकुल, दोन छोटेखानी सुसज्ज रुग्णालये, रेल्वे स्थानका जवळ वाहनतळ, भाजी मंडई. त्याचप्रमाणे आंबिवलीमध्ये ग्रंथालयाची असलेली नितांत
आवश्यकता पूर्ण झाली पाहिजे.
जनतेची मानसिकता आणि सहभाग
शहराच्या नेतृत्वाबरोबरच येथील जनतेची मानसिकता विकासाच्या दृष्टीने सकारात्मक
असणे महत्वाचे आहे. जनतेचा सक्रिय सहभाग हा शहर विकासाला पोषक ठरणारा असतो. नागरी
सुविधांच्या नावाने ‘लूटमार’ करणार्या लोकप्रतिंनिधी आणि अधिकार्यांवर अंकुश
ठेवण्यासाठी, शहर विकासात कल्पक सहभाग देण्यासाठी सुजाण
आणि जागरूक आंबिवली आणि टिटवाळावासीयांनी पुढे आले पाहिजे. शहर विकास
समित्या वा अन्य संघटनात्मक मंचच्या माध्यमातून येथील जनतेने शहर विकासाला दिशा
देण्यात आपले योगदान दिले पाहिजे.
अन्यथा खेळखंडोबा अटळ !
आंबिवली आणि टिटवाळा येथील नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि सुजाण नागरिकांनी आता तरी अधिक उशीर न
करता शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले पाहिजे. येथील जनतेला पुरेशा नागरी
सोयीसुविधा पुरविल्या पाहिजेत. राज्य सरकार आणि अन्य प्राधिकरणांकडील विविध योजना, प्रकल्प या जोडशहरांसाठी खेचून आणले पाहिजेत.
तसे न झाल्यास या भागाचा खेळ खंडोबा यापुढेही असाच सुरू राहील, हे ठरलेलेच आहे !
--
लेखक : प्रविण आंब्रे 