मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

आंबिवलीत साकारले स्मशानभूमी, वैकुंठेश्वर मंदीर अन विरंगुळ्याचे ठिकाण

आंबिवलीत साकारले ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकाराने
स्मशानभूमीवैकुंठेश्वर मंदीर अन विरंगुळ्याचे ठिकाण

शासकीय मदतीची वा पुढाकाराची वाट न पाहता आंबिवली येथील मोहोने गावातील ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन येथील गणेशघाट परिसराचा विकास केला आहे. उल्हास नदीच्या किनारी असलेल्या गणेशघाट परिसरात सुसज्ज स्मशानभूमीसह वैकुंठेश्वर महादेव मंदीरनयनरम्य उद्यान विकसित करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे हा परिसर नागरिकांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण बनले आहे.  

पूर्वीचे मोहोने गाव महापालिकेत आल्यानंतर त्याची प्रभागनिहाय रचना झाली. गेल्या काही वर्षांपासून मोहोने व परिसरातील एनआरसी कॉलनीगाळेगावमोहिलीबल्याणीआंबिवलीअटाळीवडवली परिसरात विकासाचे वारे वाहू लागले. असे असले तरी मोहोने प्रभागात सुसज्ज अशा स्मशानभूमीची वाणवा होती. गणेश घाटनजिक उघड्यावर अंत्यविधी उरकण्यात येत असे. प्रभागात सुसज्ज अशी स्मशानभूमी असावी अशी येथील नागरिकांची खूप दिवसापासूनची मागणी होती. गावातील स्थानिक रहिवाशांच्या मोहोने ग्रामस्थ मंडळाने या बाबीवर विचार सुरु केला व उल्हास नदी किनारी गणेशघाट लगतच्या मोकळ्या भूखंडावर ग्रामस्थांच्या वर्गणीतून सुसज्ज स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी जंगलस्वरूप असलेला हा भाग सुनियोजित पध्दतीने आकार घेऊ लागला. दरम्यान स्मशानभूमीचे काम प्रत्यक्षांत सुरु होऊन पूर्णदेखील झाले. परिसरात वडबदामभेंडी व अन्य झाडांसह फुलझाडे लावण्यात आली.

सामाजिक काम असल्याने स्मशानभूमीच्या कामासाठी काही ग्रामस्थांनी आपली जमीनही देऊ केली. त्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढला होता. दरम्यान येथील पूर्वीपासून असलेल्या गणेश घाटाचे तत्कालीन आमदार प्रकाश भोईर यांच्या निधीतून नुतनीकरणाचे काम करण्यात आले होते. पुढे दहनविधीनंतर दशक्रिया करण्यासाठी उर्वरित जागेवर वैकुंठेश्वर महादेवाचे मंदीर बांधण्याची कल्पना काही ग्रामस्थांना सुचली व त्यांनी लोकवर्गणी काढून मार्च २०१५ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरु करून वर्षभरात पूर्ण केले. २०१६ मध्ये महाशिवरात्रीला मंदिरात महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आर्थिक स्थिती चांगली नसलेल्यांना दशक्रिया विधीसाठी आवश्यक सुविधा ग्रामस्थ मंडळ मोफत पुरविणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 
मंदिरासमोरील मोकळ्या जागेत उंचावर बैठ्या स्थितीतील १२ फुट उंचीची महादेवाची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती आंबिवली व परिसरातील श्रद्धाळू भाविकांचे विशेष आकर्षण बनली आहे. या मूर्तीभोवती नयनरम्य कारंजे उभारण्यात आलेविद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा परिसर अधिकच आकर्षक दिसतो. या सर्व विकास कामासाठी मोहोने ग्रामस्थ मंडळासह सर्वच ग्रामस्थ एकजुटीने झटत आहेत.  
ग्रामस्थांसाठी सुसज्ज स्मशानभूमी असावी या उद्देशाने आम्ही स्मशान भूमी बांधली. पुढे जसजशा नवीन कल्पना सुचल्या तसा मोहोने ग्रामस्थ मंडळाने गणेशघाट परिसर विकसित केला. महापालिका व राज्य शासनाकडून जशी मदत उपलब्ध होईल ती आम्ही घेत आहोत अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.


महाशिवरात्रीची जय्यत तयारी
भाविकांना तसेच येथे येणाऱ्या नागरिकांचे उन्हापासून रक्षण व्हावे म्हणून एका ग्रामस्थाने स्वखर्चाने भव्य निवारा शेड बांधून दिले आहे. या विकसित परिसराभोवती संरक्षण भिंत व सुशोभीकरणासाठी विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाने विशेष निधीतून २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सुपूर्द करण्यात आला आहे. लवकरच सदर काम मार्गी लागेल असे सांगण्यात येत आहे. मधल्या काळात येथून जवळून जाणारा डांबरी रस्ता नव्याने करण्यात आल्याने येथील वर्दळ वाढण्यास मदत झाली आहे.
महादेवाचे मंदीर बनल्याने येथे आता महाशिवरात्रीला व प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पूजेसाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. येणाऱ्या महाशिवरात्री (दि. २४ फेब्रुवारी ) उत्सव साजरा करण्यासाठी मोहोने ग्रामस्थ मंडळाने जय्यत तयारी सुरु केली आहे.


विरंगुळ्याचे ठिकाण
मोहोने ग्रामस्थ मंडळाच्या प्रयत्नाने हा गणेशघाट परिसर आता प्रभागातील व आसपासच्या नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण ठरू लागले आहे. सायंकाळी काही क्षण निवांतपणे घालवण्यासाठी रहिवाशांचे समूह येथे भेट देतात. तसेच दररोज सकाळी आणि रात्री वॉकला जाण्यासाठी हौशी तरुण व नागरिकांना एक चांगले ठिकाण गवसले आहे. विशेष म्हणजे एका ग्रामस्थाने या ठिकाणी वाय फाय सुविधा मोफत पुरविली आहे. तरुणांसाठी ती एक पर्वणीच ठरली आहे.

सेल्फी पोइंट
येथील एका भिंतीवर चितारलेले महादेवाची पिंड घेऊन येणाऱ्या बालगणेशाचे पेंटिंग्ज या परिसराचे आणखी एक विशेष आकर्षण ठरत आहे. आबालवृद्ध या चित्रासमवेत सेल्फी काढण्याचा आनंद लुटताना दिसतात.


लेखक - प्रविण आंब्रे
मो. ७७००००९५६७